पाच वर्षांखालील मुलांना मास्कची सक्ती नाही; केंद्र सरकारकडून मुलांच्या मास्क वापराबाबत नवी नियमावली

402

New Delhi News : पाच वर्षांखालील मुलांना आता मास्क बंधनकारक असणार नाही. आरोग्य मंत्रालयानं याबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार 5 वर्षांखालील मुलांना मास्क वापरण्याची सक्ती नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 6 ते 11 वयोगटातील मुलं पालकांच्या देखरेखीखाली मास्कचा योग्यरित्या वापर करु शकतात, असं या नियमावलीमध्ये म्हटलं आहे. 

सरकारनं सांगितलं की, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या उपचारात अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची शिफारस केलेली नाही. जर स्टिरॉइड्सचा वापर त्यांच्या उपचारांमध्ये केला जात असेल तर, क्लिनिकल सुधारणेवर अवलंबून डोस 10 ते 14 दिवसांत कमी केला पाहिजे. 

आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी 18 वर्षांखालील मुलांसाठी कोविडशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यात असंही म्हटलंय आहे की, 5 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्कची शिफारस केलेली नाही. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असं म्हटलं आहे की, 6 ते 11 वर्ष वयोगटातील मुलं पालकांच्या थेट देखरेखीखाली सुरक्षित आणि योग्य पद्धतीनं मास्क वापरू शकतात.

मंत्रालयानं म्हटलंय की, 12 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींनी मास्क घालणं गरजेचं आहे. अलीकडेच, तज्ञांच्या एका गटानं या मार्गदर्शक तत्त्वांचं पुनरावलोकन केलं आणि कोरोना विषाणू आणि त्याच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळं संसर्गाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन ते जारी केलं आहे.

 देशात प्राणघातक कोरोना (Corona) व्हायरसच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासोबतच कोरोनाचा सर्वात वेगाने पसरणारा प्रकार असलेल्या ओमायक्रॉन प्रकाराच्या (Omicron Variant) रुग्णांमध्येही वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे तीन लाख 47 हजार 254 नवीन रुग्ण आढळले असून 703 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारांच्या आतापर्यंत 9,692 रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील दैनदिंन रुग्णवाढीचा दर 17.94 टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 20 लाख 18 हजार 825 झाली आहे. त्याचबरोबर कोरोना महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 88 हजार 396 झाली आहे. आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात 2 लाख 51 हजार 777 लोक कोरोनोतून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 3 कोटी 60 लाख 58 हजार 806 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here