कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र, त्याला अनेक मर्यादा येत असल्याने, शालेय शिक्षण विभागाने गतवर्षीप्रमाणे यंदाही पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुक्त गावात शाळा सुरु झाल्या असल्या, तरी शहरी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण यंदाही ऑनलाईन पध्दतीनेच सुरु आहे. मात्र, ऑनलाईन शिकविताना शिक्षकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शिक्षक संघटना, मुख्याध्यापकांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती.
शिक्षक-पालक संघटनेने केलेली मागणी, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी पहिली ते 12 वीपर्यंतचा 25 टक्के पाठ्यक्रम कमी केल्याची माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली.
यंदाही शाळा सुरु होणे अवघड
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्याने यंदाही शाळा सुरु होणे अवघड आहे. अशा वेळी विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा, तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖