पंजाबमधील आप सरकारने काल सुरक्षा काढून घेतली, आज काँग्रेस नेते आणि गायक सिद्धू मुसेवालांची गोळ्या घालून हत्या

588

चंदीगड : पंजाबमधील आप सरकारने काल 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली. पंजाब सरकारने कालच 424 लोकांची सुरक्षा काढून घेतली होती. यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता.यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डाॅ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.

अकाली नेते विक्कू मिद्दूखेडा यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर होता. ते पुढील आठवड्यात गुडगावमध्ये आपला शो करणार होते. गेल्यावर्षी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी डाॅ. विजय सिंघला यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अलीकडेच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सिंघला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे.

भगवंत मान सरकारने काल 424 व्हीआयपी लोकांची सुरक्षा काढून घेतली होती. ज्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली त्यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी आणि माजी आमदारांचा समावेश आहे. यापूर्वी सुद्धा पंजाब सरकारने माजी मंत्री आणि नेत्यांसह 184 लोकांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येने काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे कुटुंबीय, चाहते आणि मित्रांप्रती आमची मनापासून संवेदना, अशा शब्दात काँग्रेसने त्यांच्या हत्येनंतर श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here