टी-20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर टीम इंडिया आता न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येत असून, त्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळविण्यात येणार आहे. या मालिकेसाठी मंगळवारी (ता. ९) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ३ टी-20 मॅचच्या सीरिजला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. 19 नोव्हेंबरला दुसरा, तर 21 नोव्हेंबरला तिसरा सामना होणार आहे.. जयपूर, रांची आणि कोलकात्यामध्ये हे तीन सामने होणार आहेत.
टी-20 वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले आहेत. टी-20 वर्ल्ड कप खेळलेल्या 8 खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. या मालिकेसाठी विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे कॅप्टन्सी देण्यात आलीय. तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीममध्ये असलेले विराट कोहली, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, राहुल चहर व शार्दूल ठाकूर यांना विश्रांती देण्यात आलीय. हार्दिक पांड्या व वरुण चक्रवर्ती यांनी टी-20 वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक कामगिरी केली..
मोहम्मद शमीने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध विकेट घेतल्या, तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात धावा मोजाव्या लागल्या होत्या. त्यामुळे शमीचाही पत्ता कट झाल्याचं बोललं जातं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकच सामना खेळलेल्या राहुल चहरलाही बाहेर करण्यात आलंय.
इंग्लंड दौऱ्यापासून विराट, बुमराह, जडेजा आणि शार्दूल हे क्रिकेट खेळत आहेत. बुमराह यानेही खेळाडूंना विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना टी-20 सीरिजमधून विश्रांती देण्यात आलीय.
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारा ऋतुराज गायकवाड, तसेच व्यंकटेश अय्यर, आवेश खान, हर्षल पटेल या नव्या चेहऱ्यांसह श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल याचे टीममध्ये पुनरागमन झालंय. फॉर्ममध्ये नसलेल्या भुवनेश्वर कुमारने टीममधलं आपलं स्थान कायम राखलं आहे.
भारतीय टीम
रोहित शर्मा (कॅप्टन), के.एल. राहुल (व्हाईस कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर. अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.




