निधन: ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन अनंतात विलीन!

*निधन: ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन अनंतात विलीन!

मराठी रंगभूमीचे, चित्रपट सृष्टीचे जेष्ठ कलावंत रवी पटवर्धन यांचे काल शनिवारी रात्री निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. रवी पटवर्धन यांचा जन्म 6 सप्टेंबर 1937 रोजी झाला होता. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 

जाणून घेऊ, ‘या’ भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा प्रवास-

रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके आणि मराठी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले होते. ‘अगंबाई सासूबाई’ ही त्यांची शेवटची मालिका ठरली. 

रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. रवी पटवर्धनांनी 150 हून अधिक नाटकांत आणि 200 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

▪️ झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांनी पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश, खलनायकी अशा भूमिका साकारल्या आहेत.

‘आरण्यक’ हे नाटक त्यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांनी ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका केली आहे.

वयाच्या ऐंशीव्या वर्षी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ करून ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले होते. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते.

बालगंधर्वांच्या अध्यक्षतेखाली 1944 साली झालेल्या नाट्यमहोत्सवात वयाच्या साडे सहाव्या वर्षी रवी पटवर्धन  यांनी पहिल्यांदा रंगभूमीवर पदार्पण केले होते.

विस्मरणाच्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले होते.
 
आज अंत्यसंस्कार- काल रात्री पटवर्धनांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मार्चमध्येही त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, मुलगी, जावई, चार नातवंड असा परिवार आहे. आज दुपारपर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here