नाशिकमध्ये जिनोम सिक्वेन्ससाठी 10 हजार नवीन किटची खरेदी करणार, प्रशासन खडबडून जागे

434

नाशिकः देशभरात वाढणारे ओमिक्रॉनचे रुग्ण पाहता नाशिक महापालिका पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. जिनोम सिक्वेन्सच्या चाचणीसाठी 10 हजार नवीन किटची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. दुसरीकडे महापालिकेने शहरात अडीच हजार खाटा सज्ज ठेवल्या आहेत आणि ऑक्सिजन प्लांटचीही प्रशासनाकडून चाचपणी करण्यात आली आहे.

कोरानाची तिसरी लाट आली तर तिचा मुकाबला करण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. शहरात 3300 बेड तयार ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी 2200 खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या सर्वाधिक साडेसहाशे खाटा आहेत. त्यात गरज पडल्यास 250 खाटा वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 150, ठक्कर डोम 325, संभाजी स्टेडियम येथे 280 खाटांची सोय करण्यात आली आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये 180 खाटा, समाजकल्याण कार्यालय कोविड सेंटर 500 खाटा, मोरी कोविड सेंटर 200 खाटा, अंबर सेंटर 300 खाटा, सातपूर मायको रुग्णालय 50, सावतानगर क्रॉम्प्टन हॉल 60 ऑक्सिजन खाटा आहेत.

नाशिकमध्ये कोरोनाची दुसरी लाट भयंकर होती. ऑक्सजिनसाठी लोकांनी रस्त्यावर अक्षरशः रांगा लावल्या होत्या. याचे भयावह चित्र मीडियातून पुढे आले होते. हे पाहता आता महापालिकेने ऑक्सिजनची चोख व्यवस्था केली आहे. दररोज 4000 मेट्रीक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवला जात आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणारे 23 प्रकल्प उभारले आहेत. त्यातून 23 मेट्रीक टन ऑक्सिजनची रोज निर्मिती होणार आहे. द्रवरूप ऑक्सिजनसाठी 246 मेट्रीक टन क्षमतेच्या 19 टाक्या आहेत. 130 मेट्रीक टन साठ्याचे 7271 ऑक्सिजन सिलिंडरही तयार ठेवण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूची संसर्ग क्षमता जास्त आहे. हे ध्यानात घेता कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सोबतच मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही वाहनातून प्रवास करा. मास्क घातलेला नसेल, तर तर आता चक्क वाहनचालकाही दंड आकारण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here