नाशिकः कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूमुळे जगभरात धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातही सार्वजनिक ठिकाणच्या वावरासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. लस नसेल, तर कुठेही प्रवेश मिळणार नाही. विनालसीकरण लोक आढळले, तर संबंधित आस्थापनांना जबाबदार धरले जाईल, या नियमांची आज गुरुवार 23 डिसेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 158 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 478 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 31, बागलाण 19, चांदवड 07, देवळा 08, दिंडोरी 17, इगतपुरी 33, कळवण 07, मालेगाव 07, नांदगाव 11, निफाड 60, पेठ 02, सिन्नर 22, सुरगाणा 09, त्र्यंबकेश्वर 02, येवला 02 अशा एकूण 237 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 229, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 06 तर जिल्ह्याबाहेरील 06 रुग्ण असून असे एकूण 478 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 13 हजार 383 रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह येवला, बागलाण, सुरगाणा आणि नांदगाव या चार तालुक्यात लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने या भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठीच महापालिच्या वतीने नाशिकमध्ये चार ठिकाणी चोवीस तास लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यात नवीन बिटको, डॉ. झाकीर हुसैन रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय आणि मोरवाडी येथील रुग्णालयात चोवीस तास लसीकरण सुरू राहणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात ओमिक्रॉनचे रुग्ण देशात वाढू शकतात, अशी भीती तज्ज्ञांनकडून व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.
कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतराचे पालन करावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. विशेषतः प्रत्येकाने मास्क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सोबतच मास्क न घालणाऱ्यांवर पुन्हा एकदा कारवाई सुरू करण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही वाहनातून प्रवास करा. मास्क घातलेला नसेल, तर तर आता चक्क वाहनचालकाही दंड आकारण्यात येत आहे.





