नाशिक : नाशिकचा दिंडोरी तालुका एका तरुणाच्या हत्येने हादरला आहे. दिंडोरीतील तळेगाव येथील घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून अज्ञात आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात तळेगाव दिंडोरी येथील सावर्जनिक वाचनालयाच्या पाठीमागील बाभळीच्या झाडाच्या झुडपात एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनास्थळावरची एकंदरीत परिस्थिती बघता त्याच्या डोक्यात दगड टाकून हत्या झाल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी वेळेचा विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. दीपक जनार्दन जाधव असे मृत तरुणाचे नाव असून तो 22 वर्षांचा होता. तो याच परिसरातील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या डोक्यात कुणीतरी दगड टाकून हत्या केली, असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तरुणाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनेचा तपास करत असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.