
औषधांच्या तुटवड्यामुळे नांदेड जिल्ह्यात एका दिवसात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालय देखील असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील सरकारी रुग्णालयात 24 तासात 2 लहान बालकांसह 14 जणांचा मृत्यू झाला. यामुळे आता राज्यातील गरीब रुग्णांना सरकारी रुग्णालयात योग्य उपचार मिळत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडं, या मृत्यूंना सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात असलेलं घाटी रुग्णालय गोरगरिबांचं रुग्णालय म्हणून प्रचलित आहे. इथं विदर्भ मराठवाड्यातील अनेक शहरांमधून रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र आता हे उपचार किती योग्य, असा प्रश्न विचारला जातोय. रुग्णालयात पुरेश्या प्रमाणात औषधी उपलब्ध नसून पुढील काही दिवस पुरेल इतकाच साठा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे राज्य सरकार गरीब रुग्णांच्या आरोग्याशी खेळत आहे का? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय.




