
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेला यंदा एक वर्ष पूर्ण झाले असून ही योजना 18 जून 2024 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना आर्थिक आधार म्हणून दरमहा 1500 रुपयांची मदत त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. मात्र अलीकडेच या योजनेत सहभागी असलेल्या महिलांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
राज्य सरकारने सुमारे 80 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केले आहेत. त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावे लागणार असून त्यांना मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे गेल्या सप्टेंबरपासून अर्ज नोंदणीचे पोर्टलही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारविरोधात आता महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
जर कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल तसेच जर कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये नियमित, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्याच्य रूपात कार्यरत असेल तर अशा प्रकरणांमध्ये अर्ज अपात्र ठरवून बाद करण्यात येत आहे.
इतर कोणत्याही विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक मदतीच्या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास, संबंधित महिलांचा अर्ज अपात्र ठरवण्यात येऊ शकतो. तसेच जर कुटुंबाच्या नावावर संयुक्तपणे पाच एकरांपेक्षा अधिक शेतजमीन असल्यास किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर (ट्रॅक्टर वगळता) चारचाकी वाहन नोंदवलेले असल्यास अशा प्रकरणांमध्येही अर्ज रद्द करण्यात आले आहेत.