- मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. यात महाविकास आघाडीतील नेत्यांच्या घरी ईडीने टाकलेल्या धाडी विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. मलिकांच्या अटकेनंतर समाजाच्या विविध स्तरांमधून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
- दरम्यान, ईडीने केलेल्या अटकेनंतर नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. ही कोठडी गुरुवार पर्यंत असल्याने काळ शेवटचा दिवस होता. त्यावेळी नवाब मलिकांना न्यायालयात हजर केले गेले. यावेळी ईडीकडून नवाब मलिक यांच्या आणखी सहा दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी न्यायालयात केली. मात्र, नवाब मलिकांच्या वकीलांनी त्याला विरोध केला. महत्वाचं म्हणजे या सुनावणी दरम्यान एक नवी माहिती समोर आली आहे. दाऊदची बहीण हसीना पारकरला नवाब मालिकांनी ५५ लाख रुपये दिल्याचा आरोप ईडीने केला होता. मात्र, त्यांनी हसीना पारकरला 55 लाख नाही तर केवळ 5 लाख रुपये दिले होते, 55 लाख रुपये दिले ती एक टायपिंग चूक होती अशी माहिती ईडीच्या वकीलांनी कोर्टात दिली आहे.
- न्यायालयात नेमकं काय घडलं?
- न्यायालयात ईडीच्या वकीलांनी म्हटलं, नवाब मलिक यांच्या कोठडीची ईडीला आवश्यकता आहे. नवाब मलिक हे तब्येतीच्या कारणास्तव हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने त्यांचा जबाब पूर्ण घेता आली नाही. त्यामुळे त्यांची पुर्ण चौकशी करता आली नाही. नवाब मलिक यांच्या 6 दिवसांच्या इडी कोठडीची मागणी ASG अनिल सिंग यांनी केली.
- सरदार खान हा ताब्यात आहे. त्याचा जबाब घेवून कोर्टाला वाचण्याकरता दिला होता. ईडीचे वकील अनिल सिंग यांनी म्हटलं, आरोपी सरदार शहवली खान याने दिलेल्या जबाबातील तपशील पाहता नवाब मलिक यांची अधिक चौकशी करायची आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आम्ही आणखी काहींचे जबाब नोंदवले आहेत. यामुळे नवाब मलिक यांची कोठडी ईडीला मिळणं आवश्यक आहे.






