नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा

    नाशिक:

    नाशिक (प्रतिनिधी): तालुक्यातील जानोरी येथील माहेर असलेल्या २३ वर्षीय नवविवाहितेने विषारी औषध सेवन करीत आत्महत्या केल्याने नाशिकरोड येथील सासरच्या सहा जणांविरुद्ध दिंडोरी पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याप्रकरणी मृत विवाहितेचे वडील भाऊसाहेब पंढरीनाथ घुमरे यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, कन्या दिव्या हिचा विवाह एक वर्षापूर्वी विजय संजय खोले (रा. खोले मळा, नाशिकरोड) यांच्याशी झाला होता.

    लग्नानंतर काही दिवसांतच खोले कुटुंबियांकडून मयत दिव्या हिस माहेरून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणण्यासाठी छळ सुरू झाला, तसेच तिच्या पतीचे बाहेर विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती दिव्याला मिळाल्याने खोले कुटुंबियांकडून दिव्याचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ सुरू होता.

    याबाबत दिव्याने माहेरच्यांना वेळोवेळी या गोष्टीची माहिती दिली.परंतु, खोले कुटुंबियांकडून सातत्याने होणाऱ्या छळास कंटाळून दिव्या हिने पाच दिवसांपूर्वी वडिलांच्या घरी विषारी औषध सेवन केले.

    तिला घरच्यांनी उपचारासाठी नाशिक येथे दाखल केले होते. परंतु, बुधवारी (दि. २५) सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

    याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार मयत दिव्या हिचा पती विजय संजय खोले, सासू रोहिणी संजय खोले, नणंद वैशाली संजय खोले, गौरी संजय खोले (सर्व रा. खोले मळा, नाशिकरोड) तसेच नणंद दीपाली विकास बोस व नंदोई विकास शिवाजी बोस (रा. जानोरी) यांच्याविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ करीत आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, सुदाम धुमाळ आदी करीत आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here