
अहिल्यानगर – ऑनलाईन खरेदीसाठी ब्लिंकिट अॅपवरून घरगुती साहित्य मागवल्यानंतर गुगलवर शोधलेल्या बनावट कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क केल्याने एका व्यावसायिकाची 4 लाख 66 हजार रूपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरलीधर रंगनाथ काळे (वय 60, रा. अमृतवेल अपार्टमेंट, बोरूडे मळा, बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते बेकरी मालाची विक्री करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे एचडीएफसी बँकेतील लालटाकी शाखेत बचत खाते असून ते मोबाईल क्रमांकाशी जोडलेले आहे. दि. 20 जुलै 2025 रोजी त्यांनी ब्लिंकिट अॅपवरून काही साहित्य मागवले होते. मात्र, ठराविक वेळेत ऑर्डर न आल्याने त्यांनी गुगलवर ब्लिंकिट कस्टमर केअरचा क्रमांक शोधला असता त्यांना एक नंबर मिळाला. त्या नंबरवर संपर्क साधल्यावर अज्ञात व्यक्तीने स्वतःला ब्लिंकिट कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले आणि व्हॉट्सअॅप कॉल करून विश्वास संपादन केला.
दरम्यान, फिर्यादी यांनी त्या व्यक्तीसोबत मोबाईल स्क्रीन शेअर केल्यावर त्यांच्या खात्यातून 4 लाख 66 हजार रूपये ऑनलाईन डेबिट झाल्याचा संदेश आला. तातडीने त्यांनी राष्ट्रीय सायबर गुन्हा पोर्टलवर तक्रार नोंदवली. फिर्यादींची रक्कम इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन बँकेच्या खात्यांवर जमा झाली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.