
अहिल्यानगर – पूर्वीच्या किरकोळ वादाचा राग मनात धरून दिल्लीगेट परिसरात राडा घातल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी रात्री घडली. अभिजित संतोष साठे आणि त्याच्या मित्र समद अन्सार शेख यांना चौघांनी मिळून लाकडी दांडक्याने मारहाण केली, तर त्यांच्या मोपेड्ची तोडफोड करून घराजवळ दहशत माजवली.
याप्रकरणी फिर्यादी अभिजित साठे यांनी तक्रारी दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सार्थक ठोंबरे, आर्येन अकोलकर व त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता मोपेडवरून दिल्लीगेट वेशीसमोर जात असलेल्या अभिजित व समदला बोलावून घेतले.
चौघांनी अभिजितच्या मोपेडची चावी काढून, शिवीगाळ करत हल्ला केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हेच आरोपी त्याच्या परिसरात पोहोचले. त्यांनी प्रथम समदच्या घराजवळ उभ्या असलेल्या दोन एक्सेस मोपेडची कोयत्याने तोडफोड केली व समदच्या कुटुंबीयांना धमकावले.
नंतर अभिजितच्या घराजवळ येऊन दरवाज्यावर दगडे मारली, शिवीगाळ केली आणि त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादत नमूद केले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.




