
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!”,नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाचा खासदार नीलेश लंके व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करत आढावा घेतला. काही भागातील काम पूर्णत्वास गेले असून उर्वरित कामाला जोरदार वेग आला आहे. “अतिशय कमी वेळात हा मार्ग नागरिकांसाठी पूर्णपणे खुला होणार आहे” अशी माहिती खासदार नीलेश लंके यांनी यावेळी दिली.
महामार्गावरील अनेक किमी अंतरातील कामे पूर्ण झाली असून शिल्लक भागात प्रचंड वेगाने काम सुरु आहे. वारंवार अडथळे, प्रशासकीय प्रक्रियांचे चक्र, कंत्राटी विलंब या सगळ्यांवर मात करत शेवटी हा मार्ग मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पाहणीदरम्यान आपल्या भूमिकेवर बोलताना खासदार लंके यांनी विरोधकांना चिमटे काढले. “काहींनी तर ‘हे काम होऊच शकत नाही’ अशा वल्गना करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तर काही जण आज काम मार्गी लागल्यानंतर श्रेय घेण्यासाठी मैदानात उतरत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
महामार्ग कामाच्या इतिहासाचा उल्लेख करताना खासदार लंके म्हणाले, “या ऐतिहासिक कामाची सुरुवात माझ्याच कार्यकाळात झाली. आणि पूर्णताही माझ्याच कार्यकाळात होणारे-हा माझा शब्द !” नगर-मनमाड मार्ग पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर प्रवास वेळ कर्मी होणार असून वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. परिसरातील उद्योग, शेती आणि दैनंदिन ये-जा यावर याचा सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
“जनता सर्व जाणते!”
या कामासाठी कोणी उपोषण केले, कोणी लढा दिला, कोणी सातत्याने पाठपुरावा केला हे नागरिक चांगलेच जाणतात, असे लंके यांनी ठामपणे सांगितले. “जनतेच्या मनात सर्व काही कोरलेले आहे. कोण लढा दिला आणि कोण फक्त घोषणाबाजी करत राहिले हे लोक ओळखतात,” असे त्यांनी नमूद केले.




