
नगर – पुणे महामार्गावर चास (ता. नगर) घाटात बुधवारी (१३ ऑगस्ट) रात्री लुटारूंनी धुमाकूळ घातला. एकाच ठिकाणी काही वेळाच्या अंतराने तीन वाहनचालकांना मारहाण करून लुटारुंनी लुटले आहे. यामध्ये एक रिक्षा चालक, पिकअप चालक व त्याच्या समवेत असलेला शेतकरी आणि एका मारुती ओमनी चालकाचा समावेश आहे.
अज्ञात चौघांच्या टोळीने अगोदर दगड फेकून वाहने थांबविण्यास भाग पाडले, नंतर वाहनचालकांना रस्त्याच्या खाली ओढत नेवून लाकडी दांडक्याने मारहाण करत लुटले आहे. याबाबत सचिन रामहरी जाधव (वय २९, रा. नांदूरघाट, ता. केज, जि.बीड, हल्ली रा. पुणे) या रिक्षा चालकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पुणे शहरात रिक्षा चालवतात. नुकत्याच झालेल्या रक्षाबंधन सणासाठी ते ११ ऑगस्ट रोजी रिक्षाने त्यांच्या नांदूर घाट गावी गेले होते.
तेथून १३ ऑगस्ट रोजी दुपारी ते पुण्याकडे जाण्यासाठी निघाले. रात्री आठच्या सुमारास चास गावच्या पुढे घाटात गेल्यावर त्यांच्या रिक्षाला कोणीतरी दगड फेकून मारला. त्यामुळे त्यांनी रिक्षा रोडच्या कडेला घेवून थांबविली. त्यावेळी अचानक तोंडाला फडके बांधलेले चार जण तेथे आले. त्यांनी फिर्यादी जाधव यांना रिक्षातून खाली ओढत मारहाण सुरु केली.
नंतर रोडच्या खाली ओढत घेवून गेले. तेथे त्यांच्या खिशातील पाच हजारांची रोकड व जारांची कानातील सहा हजार रुपये किंमतीची सोन्याची बाळी काढून घेतली. तसेच आरडाओरडा केला तर येथेच तुला जीवे मारू, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या जाधव यांनी रिक्षा घाटाच्या वर गेल्यावर एका हॉटेल जवळ थांबून तेथील नागरिकांना माहिती दिली. तसेच त्यांच्या मदतीने डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना कळविले.रिक्षा चालक सचिन जाधव हे त्या हॉटेल वर थोडावेळ थांबल्या नंतर याबाबत फिर्याद देण्यासाठी नगरकडे येऊ लागले. तेव्हा त्यांना त्याच लुटमारीच्या ठिकाणी एक पिक अप उभी दिसली.
तिच्या जवळ दोन जण उभे होते. जाधव यांनी त्यांना विचारले असता पिकअप चालक धुळाजी मारुती भिसे (रा. पिंपरी घाट, ता. आष्टी, जि. बीड) याने सांगितले की मी व माझ्यासोबत असलेले शेतकरी राजू तुकाराम हाके (रा. दादेगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे आम्ही दोघे त्यांच्या शेतातील डाळींब पिक अपमध्ये घेवून पुणे येथील मार्केटमध्ये विक्री साठी चाललो असून या ठिकाणी आमच्या पिकअपला कोणीतरी दगड मारल्याचा आवाज आल्याने आम्ही गाडी थांबविली असता अंधारातून तीन चार जण आले व त्यांनी आम्हा दोघांना मारहाण
लुटारूंच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना..
या घटनांची माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी तात्काळ पोलिस पथक लुटारूंच्या शोधासाठी पाठविले. पोलिसांनी रात्रभर या महामार्गावर सर्च ऑपरेशन राबविले, मात्र तीन जणांना लुटल्यानंतर लुटारू पसार झाले. पोलिसांना ते सापडले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालक सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी तीन ते चार लुटारूंवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक गिते पुढील तपास करत आहेत.