
अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव शिवारात अहिल्यानगर- पुणे महामार्गावर सकाळी 6.00 वाजन्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीचा बिबट्या ठार झाला.
कामरगाव शिवारातील काळ्याच्या डोंगराकडून नगर पुणे महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाचा धक्का लागून बिबट्या गंभीर जखमी झाला. त्या अवस्थेत तो रस्ता पार करून रस्त्याच्या कडेला निपचित पडला. हि माहिती नवनाथ ठोकळ यांनी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांना सांगितली त्यांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले.
त्यानुसार वन परिक्षेत्र अधिकारी अविनाथ तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक कृष्णा गायकवाड, वन कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून बिबट्याला ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीसाठी वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाकडे सुपूर्द केले.
यावेळी अहिल्यानगर पुणे महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी वाहने थांबून मोठी गर्दी केली होती. मागील काही दिवसापासून या भागात बिबट्यांचा सतत वावर असून वन विभागाकडून आवश्यक वेळी पिंजरे लावले जातात. तरी शेतकऱ्यांनी व जनावरे चारणाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांनी सांगितले.



