नगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार ; शेतकऱ्याच्या एलआयसी पॉलिसीवर परस्पर 10 लाखांचे कर्ज

    34

    जामखेड – तालुक्यातील वाघा येथील शेतकरी महेंद्र बारस्कर यांनी घेतलेल्या एलआयसी पॉलिसीवर बनावट कागदपत्रांद्वारे परस्पर 10 लाखांचे कर्ज काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत एलआयसीच्या मुख्य कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली असून फसवणूक प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. अन्यथा आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी, शेतकरी बारस्कर यांनी दि. 15 नोव्हेंबर 2010 रोजी जामखेड येथील एलआयसी कार्यालयातून विमा पॉलिसी खरेदी केली होती. आतापर्यंत 1 लाख 17 हजार 600 रुपयांचे सुमारे 14 हप्ते भरले आहेत. 15 व्या हप्त्यासाठी दिलेला चेक रद्द करण्यात आल्याने त्यांनी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता तुम्ही 10 लाखाचे कर्ज काढले असल्याचे सांगण्यात आले. बारस्कर यांनी बँक खात्याचे विवरण सादर करत कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नसल्याचे सांगितले. पण त्यांना अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. त्यानंतर बारस्कर यांनी एलआयसीच्या मुख्य कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयालाही तक्रार अर्ज दाखल केला. अर्जात म्हटले आहे, पॉलिसी कर्ज फॉर्म, डिस्चार्ज व्हाउचर, संमती पत्र किंवा अन्य कोणतेही कागदपत्रावर मी सही केलेली नाही. पॉलिसी बॉण्ड माझ्याकडे असून तो कधीही एलआयसी कार्यालय, एजंट किंवा इत कोणालाही दिलेला नाही. त्यामुळे सदर कर्ज हे पूर्णपणे बेकायदेशीर, फसवणुकीने व बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेले आहे. मी याबाबत चौकशी केली असता असे निदर्शनास आले की, दि. 19 एप्रिल 2022 रोजी माझ्या पॉलिसीवर परस्पर काढलेली कर्जाची रक्कम एलआयसीच्या जामखेड शाखेतील कर्मचाऱ्याने त्याच्या खात्यात वर्ग करून परस्पर विल्हेवाट लावली आहे.

    कर्मचारी व संबंधित एजंट यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केली, माझ्या पॉलिसीवर बेकायदेशीर कर्ज उचलून आर्थिक अपहार केला आहे. याप्रकरणी संबंधित सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, माझ्या एल आयसी पॉलिसीवर बेकायदेशीररित्या टाकलेला कर्जाचा बोजा त्वरित कमी/रद्द करण्यात यावा, संपूर्ण प्रकरणाची सखोल, निपक्ष व स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणीही बारस्कर यांनी अर्जाद्वारे केली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here