
अहिल्यानगर-शाळेमधील मुलांच्या भांडणाचा राग मनात धरून, एका मुलाला पान टपरीच्या उद्घाटनावेळी गाठून तब्बल 12 ते 14 जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना आलमगीर परिसरात घडली आहे. याप्रकरणी, पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फैजान व आयान या दोघांसह अन्य दहा ते बारा अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मुलाचे आणि संशयित आरोपींचे काही दिवसांपूर्वी शाळेमध्ये भांडण झाले होते. हाच राग आरोपींच्या मनात होता. 12 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास पीडित मुलगा आलमगीर येथील एका पान टपरीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गेला होता. हीच संधी साधून, फैजान आणि आयान हे आपल्या 10 ते 12 अज्ञात साथीदारांना घेऊन त्याठिकाणी आले. त्यांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून पीडित मुलाला अडवले.. आरोपींनी त्याला शिवीगाळ व दमदाटी केली.
काही कळण्याच्या आतच या टोळक्याने मुलाला घेरले आणि त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यामुळे मुलगा प्रचंड घाबरला होता. त्याने घरी जाऊन घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. मुलाच्या आईने तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी फैजान, आयान व त्यांच्या इतर 10 ते 12 अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.



