जमावाने चोर समजून केलेल्या हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्यासह चार जण गंभीररित्या जखमी झाल्याची धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडली आहे.
• नगरमध्ये पालघरची पुनरावृत्ती थोडक्यात टळली.
• चोर समजून पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर हल्ला.
• जामखेड पोलीस ठाण्यात तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
बीड जिल्ह्यातून कोंबड्या खरेदीसाठी अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या चौघांना जमावाने चोर समजून बेदम मारहाण केली. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा आणि त्याच्या नातेवाईकांचा समावेश आहे. काही गावकऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे पालघरची पुनरावृत्ती टळली. सरपंच आणि पोलीस आल्यानंतर चौघांची सुटका झाली. जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी या चौघांनाच चोर समजून पकडले होते.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार केली. जामखेड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत 25 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


