नगरमधून 7 वर्षापुर्वी अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी सापडली मध्यप्रदेशात ; नगरच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने लावला शोध.
अहमदनगर -नगरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या मल्हारवाडी (नवनागापूर) भागातून 7 वर्षापुर्वी अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात नगरच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला यश आले असून सदर मुलीला फुस लावून पळवून नेणारा आरोपी व त्या मुलीला मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे
.नगरच्या एमआयडीसी परिसरात कामानिमित्त आलेल्या राहुलसिंग गौंड (रा.कटरा, जि.जबलपूर, मध्यप्रदेश) याने मल्हारवाडी परिसरातून एका अल्पवयीन मुलीला 23 सप्टेबर 2015 रोजी फुल लावून पळवून नेले होते.
याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात भा.दं.वि.क. 366 (अ), 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलिसांना 7 वर्ष या गुन्ह्याचा तपास लागला नव्हता त्यामुळे 28 जानेवारी 2022 रोजी सदरचा गुन्हा नगर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाकडे तपासाकामी वर्ग करण्यात आला.
या कक्षाचे प्रभारी पो.नि. भीमराव नंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, पो.हे.कॉ. एस. बी. कांबळे, महिला पोलिस हे.कॉ. पवार, लोहाळे, पो.कॉ. तांदळे यांच्या पथकाने अवघ्या 15 दिवसात सदर आरोपी व अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेत त्यांना त्यांच्या दोन लहान मुलांसह मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातून ताब्यात घेत नगरला आणले.
सदर आरोपी व अल्पवयीन मुलगी यांना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.