
अहिल्यानगर – अहिल्यानगर – छत्रपतीसंभाजीनगर मार्गावर ट्रक थांबवून चालकावर चाकूने हल्ला करत त्यांच्याकडील रोकड जबरदस्तीने लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी १२ तासांत छडा लावला आहे. पकडलेल्या चौघांकडून ७५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात धीरज ऊर्फ जॉकी जॉन आवारे (वय १९ रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) याला अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत ट्रकचालक बालाजी किसन इंगळे (वय ३३, रा. कारेगव्हाण, जि. बीड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास ते त्यांच्या ताब्यातील ट्रक घेऊन जात असताना हटिल स्वागत, जेऊर टोलनाक्याजवळ चार अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवून, त्यांच्यावर चाकू सदृश लांब हत्याराने हल्ला केला. त्यानंतर खिशातील रोख १५ हजार रूपये जबरदस्तीने काढून संशयित पळून गेले. या हल्ल्यात इंगळे जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेतला. मिळालेल्या माहितीवरून धीरज उर्फ जॉकी जॉन आवारे आणि त्याचे तीन अल्पवयीन साथीदार हे गांधीनगर परिसरात असल्याचे निष्पक्ष झाले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत चारही संशयित आरोपीना ताब्यात घेतले.सखोल चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
ही कामगिरी सहायक निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंमलदार राकेश खेडकर, राजू सुद्रीक, सचिन आडबल, संदीपान पितळे, शैलेश रोहोकले, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, शिवाजी मोरे, राहुल गुंडू यांच्या पथकाने केली.