धक्कादायक! हिजाब घातला म्हणून महाविद्यालयात प्रवेश नाकारला; विद्यार्थीनींची कोर्टात धाव, कर्नाटकच्या उडपीमधील प्रकार

489

बंगळुरू : कर्नाटकमधील (Karnataka) एका सरकारी कॉलेजमध्ये (government college) काही मुस्लीम मुलींनी हिजाब घातल्याने त्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली आहे. कर्नाटकातील उडपी येथील कुंदापूर परिसरातील ‘पीयू’ महाविद्यालयामध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे हे कॉलेज आता चांगलेच चर्चेत आले आहे. हिजाबवरून वाद निर्माण झाल्यानंतर कर्नाटकचे शिक्षण मंत्री बीसी नागेश (Education Minister BC Nagesh) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा वाद 20 दिवसांपूर्वी सुरू झाला आहे, त्यापूर्वी या महाविद्यालयात येणाऱ्या मुली या हिजाब घालत नव्हत्या असे नागेश यांनी म्हटले आहे. दरम्यान फ्री प्रेस जर्नलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आता या संबंधित मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर येत्या 8 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

हिजाब घातल्याने काही मुलींना महाविद्यालयाने प्रवेश नाकारला आहे. याविरोधात आता या संबंधित मुलींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर येत्या 8 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. आम्हाला हिजाब परिधान करून वर्गात बसण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी या विद्यार्थिनींनी केली आहे. आम्ही केवळ हिजाब घातला म्हणून महाविद्यालय प्रशासनाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारला, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीला त्याच्या धर्माचे तत्वे पाळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे धार्मिक आणि मूलभूत अधिकारांमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी विनंती याचिकेत मुलींनी केली आहे.

दरम्यान आम्ही हिजाब घालून कॉलेजला गेलो म्हणून कॉलेज प्रशासनासह प्राचार्य, उपप्राचार्य आणि शिक्षकांनी आमचा अपमान केल्याचा दावाही या मुलींनी केला आहे. हा वाद 28 डिसेंबर 2021 पासून सुरू झाला आहे. त्या दिवसापासून आम्हाला महाविद्यालयात बसू देण्यात आले नाही. तसेच आम्हाला आमच्या पालकांना घेऊन येण्यास सांगितले होते. प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या पालकांना घेऊन आलो, मात्र कॉलेज प्रशासनाने साधी त्यांची भेट देखील घेतली नाही. त्यांना दिवसभर महाविद्यालयात बसून ठेवण्यात आल्याचा दावा या विद्यार्थिनींनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here