देशातील बड्या उद्योगपतीच्या मुलीच्या बँक अकाउंटवर डल्ला, कुलाबा पोलिसांकडून तपास सुरु
अनिश पाटील
मुंबई : देशातील बड्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या शापूरजी पालमजी ग्रुपच्या प्रमुखांच्या मुलीच्याच खात्यावर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 62 वर्षीय लैला रुस्तम जहांगीर यांच्या खासगी बँकेतील खात्यात सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. लैला या उद्योगपती पालोनजी शापूरजी मिस्त्री यांच्या कन्या आहेत. त्यांच्यावतीने कुलाबा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती होती.
लैला या व्यवसायानिमित्त सध्या दुबईत वास्तव्याला आहेत. त्यांनी एका खासगी बँकेच्या परळ येथील शाखेत खाते उघडले होते. या खात्याचे आर्थिक व्यवहार करण्याचा कायदेशीर अधिकार मँन्डेट होल्डर अर्जावरून त्याचे वडील पालनजी शापूरजी मिस्त्री यांना दिलेले होते. पालनजी हे वयोव्रुद्ध झाल्याने 2018 मध्ये सदर खात्याचे आर्थिक व्यवहार करण्याचे कायदेशीर अधिकार कंपनीचे संचालक फिरोज कावशहा भाठेना यांना देण्यात आले होते.
लैला जहांगीर या परदेशी रहात असल्याने आणि परदेशात भारतीय मोबाईल क्रमांक चालत नसल्याने तब्बल 10 वर्षांपासून त्यांच्या सांगण्यावरुन या बँक खात्याचे अधिकार तक्रारदार जयेश मर्चंट यांच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करण्यात आले होते.
1 जूनाला या मोबाईल क्रमांकावर बँक खात्यामधुन 10 हजार काढण्यात आल्याचे चार संदेश प्राप्त झाले. त्यानंतर दुपारी पुन्हा त्याच बँक खात्यातून 10 हजार रुपये चारवेळा काढल्याचा संदेश आला. त्याबाबत फिरोज भाठेना यांचाकडे चौकशी केली परंतु त्यानी सदरची रक्कम काढली नसल्याची सांगीतले. त्यानंतर तक्रारदाराने बँकेत चौकशी केली. त्यावेळी या खात्यातून विविध ठिकाणी खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.




