
देशभरात झालेल्या टोमॅटोच्या दरवाढीचा धसका घेत चिंताग्रस्त झालेल्या केंद्र सरकारने अखेर नेपाळमधून टोमॅटो आयातीचा निर्णय घेतलेला आहे. टोमॅटोची ही आयात 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राहणार असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने काढलेल्या पत्रात नमूद केले आहे. सध्या बाजारपेठेत टोमॅटोचा घाऊक दर 700 ते 1100 रुपये असून, किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर 150 ते 160 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे आयात टोमॅटोची आवक कधी सुरू होऊन ती वाढणार त्यानुसार दरपातळीवर परिणाम होईल.
तर आवक वाढल्यास टोमॅटोचे दर घटून देशांतर्गत टोमॅटो उत्पादक शेतकर्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे नेपाळमधील टोमॅटोची प्रत्यक्ष होणारी आयात किती लवकर आणि किती प्रमाणात होणार, त्यानुसार दर पातळीवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती कृषी व पणन विभागातील सूत्रांनी दिली. नेपाळमधून भारतात टोमॅटो फळांच्या वापरासाठी आयात करण्याच्या प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली आहे.
तसेच आयात करताना तेथील कीडरोगमुक्त टोमॅटोच्या आयातीवर लक्ष केंद्रित करण्याबाबत फरीदाबाद येथील वनस्पती संरक्षण सल्लगार यांना दिलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आयात टोमॅटोची आवक वाढल्यानंतरच बाजारातील दरावर परिणाम संभवू शकतो, असेही सांगण्यात आले.