देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला ‘शिवतीर्थ’वर, मनसे-भाजप युतीच्या चर्चेला उधाण

603

Devendra Fadnavis meets Raj Thackeray : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याआधी चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, काही मुद्द्यावर एकमत न झाल्यामुळे युतीची चर्चा फिसकटल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली आहे. या भेटीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली असावी.

दिवाळीमध्ये भाजप आमदार आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याआधी चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नाशिकमध्ये भेट झाली होती. मागील दोन ते तीन महिन्यांपासून मनसे-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरु आहे. त्यातच आता फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेट दिल्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलेय. नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर दिवाळीमध्ये राज ठाकरे आपल्या नव्या घरी शिफ्ट झाले. राज ठाकरे यांनी कृष्णकुंजच्या शेजारीच नवे घर बांधले आहे.  या नव्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आहे. या भेटीत राज्यातील परिस्थिती आणि युतीवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.  

2019 मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली. शिवसेनेनं साथ सोडल्यानंतर भाजप नव्या मित्रपक्षासोबत युती करण्यास उत्सुक आहे. भाजपा आणि मनसे युती होऊ शकते, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. या युतीचा पहिला प्रयोग मुंबई महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या मनसेने गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाची वाट धरल्याचेही पाहायला मिळालं.  भाजपही हिंदुत्वाच्या विचारसरणीला मानणारा पक्ष आहे. त्यामुळे हिंदुत्व दोन्ही पक्षांना जोडणार समान धागा आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं, त्यामुळे भविष्यात या दोन पक्षांमध्ये युतीची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here