नवी दिल्ली : सध्या देशात आलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची उच्चतम पातळी १५ जानेवारीपर्यंत राहणार असून या दिवसांत देशात रोज ४ ते ८ लाख नवे रुग्ण आढळतील. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दररोज दीड लाख खाटांची आवश्यकता राहील, अशी माहिती कानपूर आयआयटीचे प्रोफेसर मनिंदर अग्रवाल यांनी ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली.
प्राे. अग्रवाल कोरोना वाढीच्या संदर्भातील सांख्यकीय तज्ज्ञ मानले जातात. दुसऱ्या लाटेसंदर्भात त्यांनी केलेली सांख्यकीय भविष्यवाणी खरी ठरली होती.
प्रो. अग्रवाल म्हणाले, “डेल्टापेक्षा ओमायक्रॉन व्हेरिएंटची ही लाट अधिक वेगाने पसरणार आहे. येत्या १५ जानेवारीपर्यंत ही लाट वाढत जाईल. या काळात देशात ४ ते ८ लाख कोरोनाबाधित आढळतील. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी देशात किमान दीड लाख खाटांची व्यवस्था रुग्णालयांमध्ये करावी लागणार आहे.या लाटेचा सर्वाधिक फटका दिल्ली व मुंबई या दोन महानगरांना बसणार असल्याचे सांगून प्रो. अग्रवाल म्हणाले, दिल्लीत रोज ३५ ते ७० हजार नवे कोरोनाबाधित आढळतील त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रोज १२ हजार खाटांची व्यवस्था रुग्णालयांमध्ये करावी लागेल. मुंबईत कोरोनाबाधित ३० ते ६० हजार आढळून येतील.
या लाटेचा अत्युच्च बिंदू १५ जानेवारीपर्यंत राहील. परंतु त्यानंतर ही लाट ओसरायला सुरूवात होईल. जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही लाट ओसरलेली असेल, असेही प्रो. अग्रवाल यांनी सांगितले.




