दरडग्रस्त व पूरग्रस्त भागातील मुक्या जनावरांच्या चाऱ्यासाठी जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी संघटना सरसावल्या पुढे

784

दरडग्रस्त व पूरग्रस्त भागातील मुक्या जनावरांच्या चाऱ्यासाठी जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी संघटना सरसावल्या पुढे

25 टन चारा कापणी करून पुरविला 9 गावातील जनावरांना

अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका):- जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यात दि. 21 व 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, पूर येणे अशा दुर्घटना घडल्या. यामध्ये जनतेची वैयक्तिक सर्व प्रकारची हानी झाली, याचबरोबर मुक्या जनावरांचेही हाल झाले. त्यांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला.
मात्र जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळून हा प्रश्न सोडविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. या दृष्टीने विचार करीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या प्रोत्साहनातून जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी कर्मचारी एकत्र आले व त्यांनी दि.2 ऑगस्ट रोजी “सहाण” या गावी सकाळी 9.00 वाजेपासूनच हातात विळा घेऊन चक्क चारा कापणीला सुरुवातच केली, आणि बघता बघता 25 टन चारा पूर व दरडग्रस्त भागातील नऊ गावांसाठी रवानाही केला.
यामध्ये जिल्हा परिषद रायगडच्या सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, अर्थ,बांधकाम अशा विविध विभागातील संघटनांचा सक्रिय सहभाग होता.
यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पशुधन विकास अधिकारी बंकट, आर्ले, गटविकास अधिकारी डॉ.दीप्ती देशमुख, महाराष्ट्र जिल्हा परिषद महासंघ रायगड शाखा अध्यक्ष तथा प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. कैलास चौलकर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, लेखापाल, ग्रामसेवक तसेच अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here