नवी दिल्ली – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशभरात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून काही ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान अनेकदा नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ देखील होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. असं असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,06,064 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाख 80 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (24 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,89,848 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.
देशाचा रिकव्हरी रेट 93.07 टक्के आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण नव्या रुग्णांच्या संख्येपैकी 60 टक्के केसेस या पाच राज्यांतील आहेत. यामध्ये कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये 50210, केरळमध्ये 45449, महाराष्ट्रात 40805, तामिळनाडूमध्ये 30580, गुजरातमध्ये 16617 रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान चिंता वाढवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने या प्रकारामुळे रुग्ण बाधित होत आहेत.