थरच्या वाळवंटातील लुप्त नदीचे अवशेष सापडले

नवी दिल्ली – सुमारे एक लाख 73 हजार वर्षांपूर्वी बिकानेर जवळील मध्यवर्ती थरच्या वाळवंटातून वाहणाऱ्या नदीचा पुरावा संशोधकांना सापडला आहे. या नदीच्या तीरावरील नागरी जीवनाबाबत आता संशोधन व्हायला हरकत नसावी, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. क्वाटरनरी सायन्स रिव्यूज या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या निष्कर्षांमध्ये मध्यवर्ती थार वाळवंटातील नलक्वारी येथे नदी असल्याचा सर्वात जुना संदर्भ मिळाला आहे.

जर्मनीतील मॅक्‍स प्लॅंक इन्स्टिट्युट फॉर सायन्स अँड ह्युमन हिस्ट्री, तामिळनाडूनधील अण्णा विद्यापीठ आणि कोलकतामधील आयआयएसईआर यांच्या संशोधकांच्या संयुक्त पथकाने म्हटले आहे की, पाषाणयुगात कच्छच्या रणामध्ये ही नदी होती आणि या नदीच्या तीरावर नागर संस्कृतीचा उदयही झाला होता. हा पुरावा म्हणजे जवळपास 173 हजार वर्षापूर्वीच्या राजस्थानातील बीकानेर जवळच्या सध्याच्या नद्यांच्या जवळपास 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीचे अस्तित्व सूचित करतात. हे निष्कर्ष थार वाळवंटातील घागर-हाकरा नदीच्या कोरड्या पात्राचा पुरावा असल्याचे संशोधकांनी सांगितले.

थरचे वाळवंट हे समृद्ध प्रागैतिहासिक आहे आणि पाषाण युगातील नागरी जीवन या नदीभोवती केवळ टिकून राहिले, एवढेच नव्हे तर विकसितही झाले, हे दर्शविणारे अनेक पुरावे आपल्याला आता सापडत आहेत. उपग्रह प्रतिमांच्या अभ्यासानुसार, नदीच्या पात्रांचे दाट जाळे थर वाळवंटात व्यापून राहिल्याचे दर्शवित आहे, असे मॅक्‍स प्लॅंक इन्स्टिट्यूट फॉर सायन्सच्या जिंबोब ब्लांकहॉर्न यांनी सांगितले.

या पथकाने नल गावाजवळ उत्खनन कार्यातून उघडलेल्या नदीतील वाळू व नैसर्गिक भुयारांचा सखोल अभ्यास केला. नदीच्या वाळूतील क्वार्टज कधी पुरले गेले हे समजण्यासाठी संशोधकांनी “ल्युमिनेसेन्स डेटिंग’ नावाची पद्धत वापरली. आफ्रिकेतल्या होमो सेपियन्सच्या फार पूर्वीच्या विकसन प्रक्रियेदरम्यान या नदीचे अस्तित्त्व होते. तसेच थरच्या वाळवंटात मानवी उत्क्रांतीच्या काळाची ही नदी साक्ष असावी, असे मानायला जागा आहे, असे संशोधकांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here