
नगर ः नगर जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षांचा कारावास (Imprisonment) व दंडाची शिक्षा सुनावली आहे. सचिन नामदेव जाधव (वय 22, रा. नांदुर विहिरे, ता. शेवगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता के. व्ही. राठोड यांनी काम पाहिले.
नांदूर विहिरे येथे महाविद्यालयातून पीडित अल्पवयीन मुलगी घरी सायकलवर येत होती. यावेळी तिच्या सायकलला आरोपींने त्याची सायकल अडवी लावली. याबाबत तुझ्या आई वडिलांना सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी त्याने दिली. याबाबत पीडितेने आई-वडिलांना सांगितले. पीडितेच्या वडिलांनी आरोपी सचिनला समजावून सांगितले. मात्र, पुन्हा त्याने पीडितेची छेड काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी तपास करत न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले.
या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी, पीडितेचे वडील, पंच साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासी अधिकारी, मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद व केसमध्ये झालेला पुरावा ग्राह्य धरून आरोपीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली. न्यायालयाने बालकांचे संरक्षण करणाऱ्या कायद्यानुसार तीन वर्षे साधा कारावास व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा, जातीवाचक उल्लेख केल्याबद्दल एक महिना साधी कैद व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद, जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एक वर्ष साधी कैद व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. या तीनही शिक्षा आरोपीला एकत्र भोगायच्या आहेत.