
२०२३ च्या सुरूवातीला केलेले संकल्प तस्सेच आहेत..एक तसूभरही पुढे सरकलो नाही..!! माझ्या माहितीच्या तलम पत्रावर एकही नवी ओळ समाविष्ट न होण्याची पुरेपूर खबरदारी घेतलीय..! संपत आलं वर्ष…हुरहूर.. हुरहूर आणि हुरहूर..ही हुरहूर हिच माझी श्रीमंती..!!खरं तर माझं कँलेंडरही तेच आणि कर्तृत्वानं तळपणाऱ्या माणसांचंही तेच… पण ह्याच परिघात त्यांच्याकडून काहीतरी भव्यदिव्य घडतं. आणि मी माझं आळशी, नीरस वास्तव कुरवाळण्यातच धन्यता मानतो..सावरकरांनी गजाआड ‘कमला’ लिहीलं… मंडालेच्या तुरूंगात पाऊल ठेवताच लोकमाऩ्य उदगारले.. बरं झालं गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ लिहायला मला वेळ हवाच होता…!! ते लोकमाऩ्य.. मी सामान्य..!! *कर्मवीर भाऊराव पाटील.* .. परवाच २२ तारखेला त्यांची जयंती साजरी केली आपण…कर्मवीरांनी उभ्या महाराष्ट्रात शेकडो शाळा सुरू केल्या..मित्रांनो स्वत:साठी एक घर बांधताना चार ठिकाणी मोडतो आपण..!! …आणि ह्या शाळा प्रस्थापितांसाठी नव्हत्याच.. तर काळोखातच हजारो पिढ्यांचे गर्भ निखळले अशांसाठी ‘आश्रमशाळा’ होत्या..!!.. काट्याचीच पादत्राणं करून हाकत आणली पोरं शाळेत.. असा हा सूर्यमाणूस!! खरंच प्रसंगी उन, वारा पिऊन कुठल्या उर्मीनं लढत असतील ही माणसं..?? त्यांच्या आतला ध्येयावेग किती पराकोटीचा असेल..!!मन मनाला खात राहतं…! वर्ष बदलताना, का कुणास ठाऊक पण जगदीश खेबूडकरांचं गाणं सारखं ओठावर येतंय..!!*ती येते आणिक जाते.. येताना कळ्या आणिते, आणि जाताना फुले मागते..*वर्ष आलं होतं, आता जातंय… आणि जाताना काहीतरी मागतंय..!!कळ्या घेऊन आलं होतं.. आणि आता फुलं मागतंय…… खरंच प्रश्न पडलाय… फुललोय का आपण..??*स्वतः भोवती आखलेल़्या आत्मकेंद्री वर्तुळात चालताना पायातलं बळ पायातच संपतय का… अशी आताशा भिती वाटू लागलीय…. वयाचाही परिणाम असेल कदाचित..!!*.. एक गोष्ट सांगावीशी वाटते…३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता बाह्य रोषणाईने आकाश उजळून जाईल….. आपण आपल्या आतलं एक *निरंजन* उजळू़या…!! बघुयात काही value addition करू शकतो का.. स्वतःच्याच बायोडेटा मध्ये..?? …. स्वतःच्या लाजिरवाण्या आणि आळशी वास्तवाला कुरवाळीत येणाऱ्या नविन वर्षात नविन संकल्प काय करायचेत, याची यादी करतोय..तुम्ही पण लागा त्याच कामाला….!!




