ताडोबा अभयारण्यात वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी; पर्यटकांच्या डोळ्यांदेखत थरार

498

चिमूर (जि. चंद्रपूर) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे (३८) या महिला वनरक्षकावर माया वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही थरारक घटना शनिवारी सकाळी ७ वाजता कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून ४ कि.मी. अंतरावर घडली. विशेष म्हणजे, पर्यटकांच्या डोळ्यांदेखत हा थरार घडला. ताडोबात वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर पहिल्यांदाच वाघाचा असा हल्ला झाला आहे.

स्वाती ढुमणे तीन वनमजुरांसह  त्यावेळी जंगलात वाघांचे चिन्ह सर्वेक्षण (ट्राॅन्झिट लाइन सर्व्हे) करीत होत्या. कक्ष क्रमांक ९७ मध्ये सुमारे २०० मीटरवर त्यांना माया वाघीण दिसली. वाघिणीला बघून त्यांनी आपला मार्ग बदलला. मात्र, काही वेळातच अचानक वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला चढविला व जंगलात फरपटत नेले. ही बाब कळताच वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून शोध घेतला असता, स्वाती यांचा मृतदेहच आढळून आला. या घटनेनंतर लगेच सर्व्हे थांबविण्यात आला, अशी माहिती व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक 

डाॅ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. वनविभागाच्या वतीने पती संदीप सोनकांबळे यांना पाच लाख दहा हजारांची तातडीची मदत देण्यात आली. त्यांना चार वर्षांची आरुषी नावाची मुलगी आहे. स्वाती ताडोबातील पहिल्या वन शहीद ठरल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here