
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला ५ डिसेंबर २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण या एका वर्षांच्या काळात महायुतीतील अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे. यातच नग्रपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष अनेक ठिकाणी आमने-सामने आले होते. त्यामुळे महायुतीमधील काही नेत्यांनी सरकारमधील काही मंत्र्यांवर टीका केल्याचं दिसून आलं. त्यामुळे महायुतीत वादाचा भडका उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाक्रे यांनी सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे तरी देखील विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलेलं नाहीं. याच मुद्यांवरून उद्धव ठाकरे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘विरोधी पक्षनेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद रद्द करा’, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
“महायुतीमधील तीनही पक्षाचे नेते एकच आहेत. तिन्ही पक्षाचं चिन्ह, नाव, वेगवेगळं असलं तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यांच्या (भाजपा) या बी टीम आहेत. मी काही दिवसांपूर्वी एक शब्द वापरला होता की अॅनाकोंडा. आता या अॅनाकोंडाचा प्रत्येय महायुतीमधील पक्षांना यायला लागलेला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना अॅनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. “खरं तर विरोधी पक्षनेतेपद महायुती सरकारने आतापर्यंत द्यायलाच पाहिजें होतं. आता एक वर्ष होऊन गेलं तरी एका वर्षांत सरकारने काहीही केलेलं नाही. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्ष नेते नाहीत. मग हे सरकार विरोधी पक्ष नेत्याला एवढं का घाबरतंय? आता तरी सरकारने तात्काळ विरोधी पक्षनेते पद जाहीर केलं पाहिजे. जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवत असाल तर मग तुम्ही देखील उपमुख्यमंत्रिपद रद्द केलं पाहिजे. कारण संविधानामध्ये उपमुख्यमंत्रिपदाबाबत कुठेही तरतूद नाही” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.



