
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीवर चर्चा सुरु आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठं पाऊल उचललं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.
या निमित्ताने राज ठाकरे यांनी स्वतः मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व शिवसेना नेते अंबादास दानवे देखील उपस्थित होते.
तसेच राज ठाकरे यांच्या सोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई देखील होते.राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी 10 मिनिट थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना घेऊन घरी गेले. सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अनौपचारिक चर्चा सुरु आहे.
दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले शिवसैनिक मुंबईत दाखल झाल्याने मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांची अलोट गर्दी उसळली आहे. या विशेष दिवसाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.