तब्बल ११ वर्षांनी सापडला खुनातला आरोपी! स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी..!
गुन्हेगार कितीही चालबाज असला तरी पोलिसांच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा आलीय.
तब्बल ११ वर्षांपासून फरार असलेला खुनाच्या गुन्ह्यातल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलंय नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही दमदार कामगिरी केलीय.
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डाॅ. बी. जी. शेखर यांनी नगर जिल्ह्यातल्या खून, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना नगर जिल्ह्यातल्या उघडकीस न आलेल्या गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेऊन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याबाबतचे मार्गदर्शन केले.
दरम्यान, नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी पोलीस ठाण्यात सन २०११ मध्ये घातपाताच्या दृष्टीने अपहरण आणि जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने खुनाचा एक गुन्हा दाखल होता.
नितीन सखाराम सोनवणे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. विशेष म्हणजे या गुन्ह्यातला मुख्य आरोपी हा तब्बल ११ वर्षे पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत नाव बदलून राहत होता.
या गुन्ह्यात ज्याचे अपहरण झाले होते, त्या व्यक्तीचादेखील काहीच शोध लागत नव्हता.अखेर नगर एलसीबीच्या पोलिसांना या खुनाची आणि त्यातील मुख्य आरोपीची माहिती मिळालीच.
एलसीबीचे पोलीस त्या मुख्य आरोपीपर्यंत कसे बसे पोहोचलेही. पण त्या आरोपीने ‘तो मी नव्हेच’चा प्रयोग करुन पाहिला.
अर्थात पोलिसांकडे पुरावे होतेच. मात्र आरोपी हा पोलिसांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात होता. हा प्रकार ध्यानात आल्यानंतर पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली आणि त्यामध्ये पोलिसांना त्या आरोपीचे मतदान कार्ड सापडले.
त्यात नाव बदलले होते.खात्री पटताच पोलिसांनी त्या आरोपीला पोलीसी खाक्या दाखवला आणि त्याने पोलिसांना ११ वर्षांपूर्वीच्या या खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. 
पोलीस तपासात त्याचे नाव अभिमान मारुती सानप असे समोर आले. ११ वर्षांपूर्वी सानप याने अनिल सखाराम सोनवणे याच्या डोक्यात लोखंडी गज घालून त्याचा खून केला होता.त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मयत अनिल सोनवणेच्या अंगावरील कपडे काढून त्याचे प्रेत बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंधखेड राजा येथे जाळून टाकले.
तब्बल ११ वर्षे आरोपी भरत सानप हा ओळख बदलून राहत होता. मात्र गुप्त बातमीदारामार्फत बीड जिल्ह्यातल्या पाटोदा येथे तो राहत होता. नगर एलसीबीच्या पोलिसांनी त्याला अटक पाथर्डी पोलिसांच्या हवाली केले.
या दमदार कामगिरीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, पोलीस हेड काँस्टेबल बापूसाहेब फोलाने, पोलीस नाईक भीमराज खर्से, सुरेश माळी, रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, देवेंद्र शेलार, चालक पोलीस हेड काँस्टेबल बबन बेरड यांनी भाग घेतला.
ज्याचा खून झाला, तो ट्रकचा मालक अनिल सखाराम सोनवणे हा आरोपी भरत सानपला सतत शिवीगाळ करायचा आणि त्याच्या बायकोबद्दलही काहीच्या काही बोलायचा. याचा राग सहन न झाल्याने भरतने अनिल डोक्यात लोखंडी गज जोरात मारला.
त्यातच तो मरण पावला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी भरतने अनिलचे प्रेत जाळून टाकले.
त्यानंतर ११ वर्षे तो नाव बदलून ठिकठिकाणी राहत होता. एकदा अशीच एकाशी हुज्जत घालत असताना भरत त्याला म्हणाला, ‘अरे नीट रहा, मी एक खून पचवलाय’. हे ऐकून संबंधिताने पोलिसांना माहिती दिली आणि भरत सानप पोलिसांना सापडला.





