
Shirdi News: शिर्डीतील लक्ष्मीनगर परिसरातगणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या तोडफोडीच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. माजी नगरसेवक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या छायाचित्रांसह स्वागताचे बॅनर फाडणे तसेच तीन दुचाकींची मोडतोड अशा घटनांमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांच्या कसोशीच्या तपासानंतर या गुन्ह्याचा उलगडा झाला असून यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तक्रारदारच आरोपी असल्याचे समोर आले आहे.
गणेश भक्तांच्या स्वागतासाठी लक्ष्मीनगर परिसरात राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, मंगेश त्रिभुवन आणि प्रतीक शेळके यांच्या छायाचित्रांसह दोन मोठे बॅनर लावण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी हे बॅनर फाडले. त्याचवेळी परिसरात उभ्या असलेल्या तीन दुचाकींची मोडतोड करण्यात आली आणि एका मोटारसायकलमधील बॅटरी चोरली गेली.
या घटनेची तक्रार विशाल राजेश आहिरे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला आणि तातडीने चार जणांना अटक केली. यामुळे परिसरात निर्माण झालेला तणाव काही प्रमाणात कमी झाला. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे नागरिकांनी कौतुक केले.
तथापि, पुढील तपासात समोर आलेली बाब सर्वांना चकित करणारी होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे स्पष्ट झाले की या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी दुसरे कोणी नसून तक्रारदार विशाल राजेश आहिरेच आहेत. त्यांनी आपल्या साथीदारांसह बॅनर फाडणे, दुचाकींची तोडफोड करणे आणि चोरी केल्याची कबुली दिली.
त्यांच्या सोबत दिनेश दवेश गोफने, राकेश सोमनाथ शिलावट (सर्व राहणार लक्ष्मीनगर, शिर्डी) आणि एक अल्पवयीन मुलगा सहभागी होता. या घटनेमागील कारण त्यांच्यातील आपसी वाद असल्याचे पोलिसांना कळाले.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे, उपनिरीक्षक सागर काळे तसेच पोलीस कर्मचारी संदीप उदावंत, बाळासाहेब गोराणे, केवल राजपूत आणि शेकडे यांनी या तपासात मोलाची भूमिका बजावली.




