सातारा दि.10 (जि.मा.का): अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील उपयोजनांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमाती प्रवर्गातील योजनांतर्गत बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेची सन 2020-21 साठीची बैठक जिल्हा परिषद येथे नुकतीच संपन्न झाली. या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यातील एकूण 653 बाबींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेअंतर्गत 64 अर्ज प्राप्त झाले हाते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत 461 व बिरसा मुंडा कृषि क्रांती योनजे अंतर्गत 32 लाभार्थींची निवड करण्यात आली.
या बैठकीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, कृषि, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभपती मंगेश धुमाळ आदि उपस्थित होते.
या योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच इत्यादी बाबींसाठी अनुदान दिले जाते. यामध्ये नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती व शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण यापैकी एका घटकाचा व त्यासोबतच्या पॅकेजचा लाभ घेता येईल. तसेच नवीन विहीर अथवा जुनी विहीर दुरुस्ती या घटकांचा यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पंपसंच, विजजोडणी आकार व सुक्ष्म सिंचन संघ या घटकांचा लाभ अनुज्ञेय आहे.
निवड झालेल्या लाभार्थींनी आवश्यक कागदपत्रे विहीत मुदतीत पोर्टलवर अपलोड करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे व पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभपती मंगेश धुमाळ यांनी यावेळी केले.
00000