महाराष्ट्रातील जनतेला कोणत्याही संकटाच्या वेळी तात्काळ पोलीस सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने ‘डायल ११२’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. आज या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला.
या प्रकल्पाद्वारे १५०२ चारचाकी वाहने तर २२६९ दुचाकी वाहनांना मोबाईल डेटा टर्मिनल व जीपीएस (GPS) यंत्रणा बसवण्यात येणार आहे. याशिवाय ४५ आयुक्तालय/ जिल्हा घटक कार्यालयांमधील पोलीस नियंत्रण कक्ष ‘बिग डेटा अॅनॅलिटिक्स’ तंत्रज्ञानासह अद्यावत करण्यात येत आहेत.

या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नागरिकांना आपत्कालीन यंत्रणेशी मोबाईल ॲप्लिकेशन, एसएमएस, ई-मेल, चॅट अशा विविध माध्यमांद्वारे संपर्क साधता येणार आहे.





