गेल्या सात वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलिस हवालदारांना अखेर न्याय मिळाला.

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने नुकतीच पोलिस भरती जाहीर केली आहे. त्यानंतर आता मोठा निर्णय घेत पोलिस खात्या अंतर्गत रखडलेली पदोन्नती जाहीर केली आहे. या निणर्यामुळे राज्यातील 1061 हवालदारांचा पोलिस उपनिरीक्षक (फौजदार) बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्याच्या पोलिस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न बघत गेल्या सात वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलिस हवालदारांना अखेर न्याय मिळाला. हवालदारांच्या या लढ्याला यश आले असून राज्यातील 1061 हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक (फौजदार) पदावर पदोन्नती मिळाली आहे.
प्रत्येक पोलिस कर्मचारी अधिकारी होऊन सन्मानाने निवृत्त व्हावा, अशी संकल्पना तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मांडली होती. त्यानुसार 2013 मध्ये पोलिस उपनिरीक्षक अर्हता परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये जवळपास 18 हजार पोलिस हवालदार उत्तीर्ण झाले होते. काहींना पदोन्नती देण्यात येत होती. मात्र, तेव्हापासून पदोन्नती देणे थांबविण्यात आले होते. अर्हता परीक्षा उत्तीर्ण हवालदारांना पदोन्नतीसाठीच्या पाठपुरवठा केला होता. पोलिस महासंचालक, गृहमंत्री ते आस्थापना विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. शेवटी या लढ्याला यश आले.
पोलिस महासंचालकांच्या आदेशाने आस्थापना विभाग प्रमुख राजेश प्रधान यांनी आज (ता. 20 ऑक्टोबर) 1061 पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती दिल्याची यादी प्रकाशित केली आहे. यादी प्रकाशित होताच राज्यातील पोलिसांमध्ये उत्साह निर्माण झाला. अनेकांनी सोशल मीडियावरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हे सर्व 1061 हवालदार लवकरच “पीएसआय’च्या वर्दीत दिसणार आहेत.
गृहमंत्र्यांकडून शुभेच्छा
राज्यातील 1061 पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलिस उपनिरीक्षकांनी अधिक जोमाने कार्य करा. तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना ट्विट करून दिल्या आहेत.