टी-20 वर्ल्ड कप : सेमी फायनलच्या राेमांचक सामन्यात न्युझीलंडचा विजय, इंग्लडसाठी हा खेळाडू ठरला व्हिलन..

541

2019च्या वर्ल्ड कपमध्ये जिवाला लागलेल्या पराभवाचे उट्टे फेडताना न्युझीलंडने अबुधाबीत इंग्लंडला 5 विकेट आणि 6 चेंडू राखून पराभूत केले. टी-20 विश्वचषकातील सेमी फायनलची रोमांचक लढत जिंकून किवीजनी दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.

न्युझीलंडसाठी या लढतीचा खरा हिरो ठरला, तो डेरील मिचेल. त्याने 72 धावांच्या नाबाद खेळी साकारताना 4 चौकार नि तितक्याच षटकारांची आतिषबाजी केली. त्याला यष्टीरक्षक डेवोन कॉनवेने उत्तम साथ देताना 38 चेंडूंत 46 धावांची धडाकेबाज खेळी केली. मिचेलला ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सुरुवातीला न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीवीर जॉस बटलर व बेअरस्ट्रो यांनी 37 धावांची भागीदारी केली. सलामीवीर तंबूत परतल्यानंतर डेव्हीड मलान आणि मोईन अली यांनी इंग्लंडचा डाव सावला.

मोईनने 37 चेंडूंमध्ये तीन चौकार, दोन षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या, तर मलान याने 30 चेंडूंत 41 धावा करत इंग्लंडची धावसंख्या 166पर्यंत पोहचवली.

इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर मार्टीन गुप्टील अवघ्या चार धावांवर माघारी परतला. न्यूझीलंडच्या फलंदाजीची भिस्त असणारा केन विल्यमसनही लवकरच बाद झाल्याने त्यांची अवस्था 2 बाद 13 अशी झाली.

त्यानंतर डेरील मिचेल आणि डेवोन कॉनवे यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. त्यांना जिमी निशाम याने 11 चेंडूंत 27 धावांची खेळी करीत न्यूझीलंडला विजयासमीप आणून ठेवले. डेरील मिचेल याने अखेरपर्यंत नाबाद राहताना न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

क्रिस जाॅर्डन ठरला व्हिलन
2016 वर्ल्ड कपमध्ये इंग्लडसाठी बेन स्टोक्स व्हिलन ठरला होता. त्याच्या अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रॅथवेटने सलग 4 सिक्सर मारुन वेस्ट इंडिजला दुसऱ्यांदा चॅम्पियन बनवलं होतं. तर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडसाठी क्रिस जॉर्डन व्हिलन ठरला.

कारण, शेवटच्या 4 ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी 57 रनची गरज होती, तेव्हा 17 वी ओव्हर टाकायला क्रिस जॉर्डन आला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्याने फक्त 10 रन दिले होते, पण तिसऱ्या ओव्हरमध्ये न्युझीलंडने तब्बल 23 रन चोपले नि याच ओव्हरने मॅचचं चित्र पालटलं.

ऑस्ट्रेलिया-पाकमध्ये आज लढत
न्यूझीलंडने प्रथमच टी-20 विश्वचषकात अंतिम सामना गाठला आहे. आज (ता.11) ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सेमी फायनलचा दुसरा सामना होत आहे. या दोघांमधून विजयी होणाऱ्या संघासोबत 14 नोव्हेंबर रोजी विजेतेपदासाठी न्यूझीलंडची लढत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here