मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेट संघाने निराशाजनक कामगिरी केली. टीम इंडियाला उपांत्य फेरीही गाठता आली नाही. झालंगेलं विसरुन आता भारतीय खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत चांगली कामगिरी करण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. तसा संघाचा प्रयत्न असेल. या मालिकेतून टीम इंडियाला नवा कर्णधार आणि नवे खेळाडूही मिळाले आहेत. टी-20 मध्ये संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली असून मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी राहुल द्रविडच्या खांद्यावर आहे. चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या नावासह अनेक युवा खेळाडूंचा भारताच्या टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र टीम इंडियाकडे आधीच चांगले सलामीवीर आहेत. केएल राहुल आणि रोहित शर्माची जोडी हे काम उत्तमरीत्या करत आहे. तसेच इशान किशन हा आणखी एक पर्याय टीम इंडियाकडे आहे. अशा स्थितीत गायकवाडला संघात स्थान मिळेल का हा मोठा प्रश्न आहे. (My mindset has always been to finish games says Ruturaj Gaikwad ahead of IND vs NZ T20 series)
उजव्या हाताच्या या फलंदाजाने मात्र संघासाठी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. गायकवाडने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी भारतीय संघातील माझ्या फलंदाजीच्या क्रमाचा विचार केला नाही, परंतु एक व्यावसायिक खेळाडू असल्याने मी परिस्थितीशी जुळवून घेण्यास तयार आहे. जेव्हा मला संधी मिळेल आणि मी चांगली कामगिरी करेन तेव्हाच मी संघात माझे स्थान पक्के करू शकेन.
मॅच फिनिश करण्यावर लक्ष
सीएसकेला यंदाच्या आयपीएल-2021 चे विजेतेपद मिळवून देण्यात गायकवाडने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो पूर्वी मधल्या फळीत फलंदाजी करायचा पण महेंद्रसिंग धोनीने त्याला सलामीला खेळण्यास सांगितले. मात्र माझे लक्ष नेहमीच सामना फिनिश करण्यावर केंद्रित असल्याचे गायकवाडने म्हटले आहे. तो म्हणाला, “मी नेहमीच सामना फिनिश करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मला या मानसिकतेची सवय झाली आहे. पण मी नेहमी गोष्टी साध्या ठेवतो. परिस्थितीनुसार मी माझ्या फलंदाजीत काही बदल केले आहेत आणि ते माझ्यासाठी उपयुक्त ठरले आहेत. एक-दोनदा धोनी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की, जेव्हा गेम तुझ्या निंयत्रणात असेल तेव्हा मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी त्याला सांगितले की, माझी मानसिकता नेहमीच मॅच फिनिश करण्याची असते.”
राहुल द्रविडबाबत ऋतुराज म्हणाला…
राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी अंडर-19 आणि इंडिया-ए संघाचा प्रशिक्षक होता. राहुलसोबत काम करण्याबाबत गायकवाड म्हणाला की, “मी इंडिया-ए संघासोबत खूप दौरे केले आहेत आणि गेल्या काही वर्षांत आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले. त्याच्यासोबत परत काम करायला आनंद होईल. त्याने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, शिकवल्या आहेत आणि त्यामुळे माझी फलंदाजी सुधारली आहे.
टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.






