
दीड वाजता रेकी; ४.३० वाजता चोरी, २४.६८ लाखांचा मुद्देमाल लंपास
शहरातील गंजबाजार परिसरातील वर्मा ज्वेलर्स दुकानात रविवारी पहाटे सव्वा चार ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी रोख, असा २४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. समोरील दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये दुकानाबाहेरील १३ मिनिटे सुरू असलेल्या हालचाली कैद झाल्या आहेत. मध्यरात्री दीड वाजता चोरट्यांनी रेकी केली. त्यानंतर ४ वाजून २२ मिनिटांनी कारमधून पाच ते सहा चोर आले. त्यांनी ४ वाजून २६ मिनिटांनी शटर उचकाटण्यास सुरुवात केली. शटर उचकटून ४ वाजून २९ मिनिटांनी चोर दुकानात शिरले व पाच मिनिटांनी म्हणजे ४ वाजून ३४ मिनिटांनी ते दुकानातून बाहेर पडले. ४.३५ मिनिटांनी त्यांनी तेथून पळ काढला. फक्त ८ मिनिटांत ही चोरी केल्याने चोरटे सराईत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
सराफ बाजारात पोलिसांनी नियुक्त केलेल्या एका सुरक्षारक्षकाच्या लक्षात हा प्रकार येताच, त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुकानाचे मालक संतोष सीताराम सहदेव ऊर्फ वर्मा (वय ५७, रा. माणिकनगर) यांना पोलिसांनी माहिती दिली. वर्मा व पोलिसांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता, सामानाची उचकापाचक झाल्याचे दिसून आले.
दुकानात ड्रॉवरमध्ये ठेवलेले ४१३ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, २८ हजारांची रोकड चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी संतोष वर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शीतल मुगडे करीत आहेत. दरम्यान, दुकानातील मोठी तिजोरी न फोडल्याने मोठा ऐवज वाचल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिकमधून कार चोरली, चांदवडला चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार दोन दिवसांपूर्वी नाशिकयेथून चोरल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच, याच चोरट्यांनी या कारमधून चांदवड येथेही एका कृषी सेवा केंद्रात चोरीचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रविवारी पहाटे नगर येथे चोरी केली, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याचे कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.



