अकोला- जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला;२१ वर्षीय तरुणीनी तडफडुन सोडला जीव
बाळापुर (जि. अकोला) : डी.एड. ची विद्यार्थिनी असलेल्या २१ वर्षीय तरुणीचा घरी झोका घेताना पाळण्याच्या दोरीचा गळफास लागुन मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी दि. १६ रोजी सायंकाळी रिधोरा येथे घडली.या घटनेमुळे रिधोरा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.कल्याणी दीपक पोटे असे मृत तरुणीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,कल्याणी ही सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरातील पाळण्यावर बसुन झोके घेत होती.तिची आई गच्चीवर कामात होती.वडील बाहेरगावी नोकरीवर गेले होते.त्यामुळे तिच्या जवळ कोणीही नव्हते.अशात ती एकटीच पाळण्यावर होती.
पाळण्याच्या दोरीवर उशी टाकुन ती बसलेली होती.अचानक उशी सरकल्याने ती कोसळुन बेडच्या काठावर पडली व दोरी तिच्या गळ्याभोवती अडकली.तिच्या गळ्याला बेडचा जबर मार लागला.काही वेळ ती तशीच पडून होती.काही वेळानंतर आई वरून खाली आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मुलीला पाहताच आईने किंचाळी फोडली.त्यामुळे नागरिकांनी कल्याणीला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात तातडीने हलविले.मात्र,डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
कल्याणी ही कुटुंबासह सर्वांचीच आवडती होती.तिचे पार्थिव आणल्यानंतर सर्वच हळहळले.लेकीच्या मृत्यूने आई-वडिलांवर आभाळ कोसळले असुन त्या दोघांचीही प्रकृती बिघडली.अत्यंत शोकाकुल वातावरणात मृत कल्याणीवर अत्यसस्कार करण्यात आले.यावेळी गाव हळहळे होते.