जुन्या जमान्यातील ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही चां शोध त्यातील लाल पाऱ्या साठी लोक झाले वेडे

अनेकांना जुन्या वस्तुंचं आकर्षण असतं. जुन्या काळात मिळणाऱ्या वस्तूंना बाजारातही चांगली किंमत असते. काही दर्दी लोक जुन्या वस्तूंच्या बदल्यात घसघशीत किंमत देतात. नेमक्या याच गोष्टीमुळे उठलेल्या एका अफवेने लातूर जिल्ह्यातील नांदुर्गा भागात एकच धुमाकूळ घातला आहे.

नांदुर्गाच्या शहरी भागासोबत ग्रामीण भागातही सध्या 1960 ते 90च्या काळात मिळणाऱ्या ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्णधवल टीव्हीचा शोध सुरू झाला आहे.हा टीव्ही शोधण्याच्या कामी तरुण पिढीबरोबरच महिला वर्गही सामील झाला आहे. विशेष म्हणजे, हा शोध घेण्यामागे कारणीभूत ठरली आहे ती या टीव्हीतल्या लाल पाऱ्याविषयीची अफवा.

पूर्वीच्या काळी जुन्या कृष्णधवल टीव्हीच्या जमान्यात लाकडी शटर असलेले 17 इंचाचे मॉडेल्स पाहायला मिळत असत. या काळातील टीव्ही आणि रेडीओमध्ये एक लाल रंगाचं पाऱ्यासारखं द्रावण असलेली छोटी नळी बसवलेली असे. कालांतराने या टीव्हीचा वापर बंद झाला. नवीन टीव्ही येऊ लागले आणि लोकं या टीव्हीला विसरली. साधारण चाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा एका अफवेमुळे हे जुने टीव्ही पुन्हा चर्चेत आले आहेत.

साठच्या दशकात तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये बसवली जाणारी ही लाल द्रावणाची नळी सध्या लाखो रुपयांना विकली जात असल्याची अफवा नांदुर्गा भागात पसरली आहे. काही जण हा आकडा वाढवून कोटीही सांगत आहेत. त्यामुळे अशी नळी शोधण्याच्या कामी इथले स्थानिक लागले आहेत. स्थानिक भाषेत रेड मर्क्युरी या नावाने ओळखली जाणारी ही नळी शोधण्यासाठी भंगार विक्रेते, टीव्ही विक्रेते यांच्याकडे विचारणा करण्यात येत आहे. काही जण तर लाखो रुपये देऊन ती विकत घेण्याची तयारीही दर्शवत आहेत. वास्तविक दोन इंचाच्या सीलबंद असलेल्या या नळीची किंमत सर्वसामान्य आहे. पण, अफवेची शहानिशा न करता नांदुर्गा भागात या नळीचा शोध घेण्याचं काम जोमाने सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here