जिल्‍हा वार्षिक योजनेचा निधीवेळेत खर्च करण्‍याच्‍या जिल्‍हाधिका-यांच्‍या सूचना

479
Maha24news.com

अहमदनगर (जिमाका) – जिल्‍हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्‍ह्याकरीता 510 कोटी रुपये इतका नियतव्‍यय मंजुर असून जिल्‍यातील सर्व यंत्रणांनी आपआपल्‍या विभागांना मंजुर झालेला निधी वेळेत खर्च करावा अशा सूचना जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्‍यात. जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात त्‍यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हा वार्षिक योजना आढावा बैठक आयोजित करण्‍यात आली होती, त्‍यावेळी ते बोलत होते. जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले म्‍हणाले ज्‍या विभागांनी निधीची मागणी केली आहे त्‍यांनी आपल्‍या प्रस्‍तावित कामांबाबत निधीच्‍या खर्चाचे नियोजन करुन आपआपल्‍या मुख्‍यालयाकडुन तांत्रिक मान्‍यता घेऊन आपले प्रस्‍ताव प्रशासकीय मान्‍यतेसाठी तात्‍काळ सादर करावेत. जिल्‍हा परिषदेने आपल्‍या विविध विभागांसाठी लागणा-या निधीची मागणी व नवीन कामांचे प्रस्‍ताव जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करावेत. आगामी काळात जिल्‍ह्यात होऊ घातलेल्‍या निवडणूक आचारसंहितेचा कालावधी लक्षात घेऊन 31 मार्च 2022 पर्यंत 100 टक्‍के निधी खर्च झाला पाहिजे असे नियोजन करावे. तसेच पुढील वर्षासाठी 2022-23 प्रारुप आराखडा तात्‍काळ सादर करावा. असेही त्‍यांनी यावेळी सांगितले. बैठकीमध्‍ये जिल्‍ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी आजपर्यंत झालेल्‍या खर्चाबाबत व नियोजनाबाबत आपल्‍या विभागाचा आढावा सादर केला. समाजकल्‍याण विभागाच्‍या अनुसूचित जाती उपाययोजनांसाठीच्‍या खर्चाबाबत आढावा यावेळी घेण्‍यात आला. या बैठकीला जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्‍हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प अधिकारी राजेंद्र भवारी आदी मान्‍यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here