जिल्ह्यात 1.14 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखालील आणणार

442


• जिल्हयाचा सिंचन आराखडा निश्चित
• रब्बी व उन्हाळी पिके वाढविण्यावर भर
• जिल्हाधिका-यांकडून सिंचनाचा आढावा
वर्धा, दि.10 (जिमाका) : कृषी उत्पादनासाठी सिंचनाचे अनन्य साधारण महत्व आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांना दोन ते तीन पीके घेता यावीत तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी जिल्हयातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. जिल्हयात 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणल्या जाणार आहे. यासाठी तालुका निहाय सिंचन आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित बैठकीत निश्चित करण्यात आला.
जिल्हाधिका-यांनी जिल्हयातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व संबधित विभागांची विशेष आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अधियंता रवी वऱ्हाडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. ससाने, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता नितू चव्हाण, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन दिल्यास कृषी उत्पादन वाढून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या सिंचन योग्य पाण्याचे योग्य नियोजन करुन जास्तीत जास्त शेती ओलीताखाली आणन्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले. बैठकीत चर्चेनंतर जिल्हयाचा सिंचन आराखडा निश्चित करण्यात आला. या आराखडयाप्रमाणे जिल्हयात 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष सिंचनाखाली येणार आहे.
सिंचन आराखडा प्रमाणे तालुकानिहाय सिंचनाखाली येणाऱ्या क्षेत्रामध्ये वर्धा तालुका 16 हजार 571 हेक्टर, सेलू 20 हजार 580 हेक्टर, देवळी 33 हजार 997 हेक्टर, आर्वी 14 हजार 782 हेक्टर, आष्टी 9 हजार 516 हेक्टर, कारंजा 3 हजार 28 हेक्टर, हिंगणघाट 7 हजार 980 हेक्टर तर समुद्रपूर तालुक्यात 8 हजार 82 हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाखाली येणार आहे. जिल्हयातील मोठे, मध्यम, लघु प्रकल्प तसेच लघु पाटबंधारे योजना, कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेटनाला बांधकाम या सर्व प्रकल्पाची उपलब्ध सिंचन क्षमता ओलीतासाठी वापरण्यात येणार आहे.
प्रकल्पातील पाण्याचा सुयोग्य वापर होण्यासाठी पाणी वापर संस्था स्थापन करण्यात याव्या. या संस्थांव्दारे शेतक-यांची पाण्याची मागणी नोंदविण्यात यावी व नियोजन करुन पाणी उपल्बध करुन दयावे, यासाठी शेतक-यांमध्ये जनजागृती करावी असे निर्देश प्रेरणा देशभ्रतार यांनी सर्व सबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले.
विहीरीमधून 45 हजार हेक्टर ओलीत
ओलीतासाठी सुलभ पर्याय म्हणुन आजही मोठया प्रमाणावर विहीरींचा वापर केल्या जातो. जिल्हयातील शेतक-यांकडे आजमितीस सिंचनासाठी 45 हजार इतक्या विहीरी आहेत. एका विहिरीमधून सरासरी 1 हेक्टर इतके क्षेत्र ओलीत केल्या जाते. याप्रमाणे विहीरीमधून 45 हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणले जाते. जिल्हयात सर्वाधिक 7 हजार 940 विहीरी हिंगणघाट तालुक्यात आहे.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here