विधवांच्या पुनर्वसनासाठी उपसमिती स्थापन करावी-उपसभापती विधान परिषद नीलम गोऱ्हे
पालघर दि. २५: पालघर जिल्ह्यातून कोरोना पूर्ण पणे नष्ट झाला नसला तरी जिल्ह्यातुन ९५% आणि ८५९ गावांतून कोरोना हद्दपार झाला असल्याबद्दल समाधान वाटते, असे मत विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. कोरोना मुक्त झालेल्या ग्रामपंचायतीचे अनुभव ऐकण्यासाठी तसेच कामगार विभाग, परिवहन विभाग, आदिवासी विभाग, रोजगार हमी योजना, प्रादेशिक परिवहन विभाग आदि विभागांनी जनतेसाठी थेट मदत जाहीर केली होती ती कितपत पोहोचली आहे, त्यात काही त्रुटी आहेत का याच्या बद्दलचा आढावा घेण्यासाठी नीलम गोऱ्हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आढावा सभा आयोजित केली होती त्यावेळी त्या बोलत होत्या. कोरोना मुक्त झालेल्या २४ ग्रामपंचायतीच्या सरपंचांकडून त्यांनी आपल्या गावाबद्दलच्या यशोगाथा जाणून घेतल्या.कोरोना काळात काय उपाययोजना केल्या, कशाप्रकारे जनजागृती केली, अडचणींवर कशा प्रकारे मात केली,लसीकरण किती प्रमाणात झाले आहे इ बद्दल सविस्तर माहिती घेतली.
तसेच महिला व बाल विकास विभागा मार्फत स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्स मधून कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांसाठी उपसमिती स्थापन करावी , तसेच विधवा महिलांचे मालमत्ता विषयक अधिकार अबाधित राहावे कोरोना च्या दुष्परिणाम यामुळे बालविवाह बालमजुरी यांसारख्या समस्या उद्भवू नयेत यासाठी दक्षता समिती स्थापन करावी ज्यात कुठल्याही पक्षाच्या महिलांचा समावेश असल्यास हरकत नाही अशा प्रकारच्या सूचना यावेळेस उपसभापती विधान परिषद नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
यावेळी गोऱ्हे यांनी ९विभागांचा आढावा घेतला. आरोग्य विभागाकडून कोव्हीड
बद्दलचा आज ची पालघर जिल्ह्यातील स्थिती काय आहे याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
रोजगार हमी योजनेचे कामात गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ६० कोटी ५० लाख रुपये मजुरी देण्यात आल्याची माहिती तसेच कामगारांची थकीत वेतन राहिले होते ते आस्थापना विभागाकडून १८ कोटी रुपये मिळाले आहेत. विविध घटकांना एकूण २७ कोटी रुपये राज्य सरकारकडून लाभधारकांना डी बी टी च्या माध्यमातून थेट मदत करण्यात आली आहे १४ हजार ५२३ रिक्षाचालकांना एक कोटी ११ लाख रुपयांची डी बी टी च्या माध्यमातून मदत केली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांना सातत्याने कृषीविषयक मदत कशी देता येईल याचा आराखडा तयार करण्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण, माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, नगराध्यक्ष उज्वला काळे, जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ, मुख्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिद्धराम सालिमठ, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, किरण महाजन आदी उपस्थित होते.