
अहिल्यानगर – गेल्या साडेतीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाने तयारी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्राची प्रथम तपासणी सुरू करण्यात आली आहे. नगरजवळील केडगाव येथील भारत निवडणूक आयोगाच्या गोडावूनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सहा हजार मतदान यंत्रे उपलब्ध करण्यात आली असून या यंत्रांची प्रथम तपासणी गेल्या सोमवारपासून सुरू आहे. पुढील आठवड्यात बुधवारपर्यंत ही तपासणी सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नगर जिल्ह्यात फेब्रवारी 2022 पासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका रखडलेल्या आहेत. या निवडणूक घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनानूसार जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या जाहिर करण्यात आलेल्या या प्रभाग रचनांवर आलेल्या हरकती आणि सुचना निकाली काढण्याची कार्यवाही सुरू आहे. चालू महिन्यांच्या 18 तारखेला अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील मागील महिन्यांत सर्वे जिल्हाधिकाऱ्यांचा प्राथमिक आढावा बैठक घेतलेली आहे. यात निवडणूक तयारीच्यादृष्टीने आवश्यक माहिती घेण्यात आली असून प्रत्ये जिल्ह्यात किती मतदान केंद्र, मतदान यंत्रे, निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, निवडणूक निर्णय अधिकारी याची माहिती घेवून त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.
दरम्यान, निवडणूक तयारीचा महत्वाचा टप्पा असणाऱ्या आणि निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्राची उपलब्धता, आवश्यक व रखीव यंत्रांची संख्या, जिल्हानिहाय उपलब्ध झालेली मतदान यंत्रे, आणखी गरज किती यंत्रांची गरज आहे, याचा अंदाज घेण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाच्यावतीने मतदान यंत्रांची प्रथम तपासणी सुरू करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यासाठी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी सहा मतदान यंत्रे उपलब्ध झाली असून या यंत्राची मागील आठवड्यापासून केडगाव येथील भारत निवडणूक आयोगाच्या गोडावूनमध्ये तपासणी करण्यात येत आहे. या सहा हजार यंत्रामध्ये बीयू, सीयू, मेमरी चिप यांचा समावेश आहे. उपलब्ध झालेल्या यंत्राच्या तपासणीनंतर जिल्ह्यासाठी आणखी किती यंत्रणांची गरज भासणार हे स्पष्ट होणार आहे.