- पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना आणि लसीकरणाचा घेतला आढावा
- अहमदनगर :- गेले दिड वर्ष कोरोनाशी संघर्ष सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट तिव्र स्वरूपाची असेल आणि त्यावेळी चौपट रुग्णसंख्या असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. तिसर्या लाटेशी सामना करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. रुग्णांना गरजेनुसार आवश्यक आॉक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी चौदा लिक्विफाईड मेडिकल आॉक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापित करण्यात येत आहेत. त्यापैकी काही प्रकल्प सुरू झाले असून अन्य प्रकल्पांची उभारणी प्रगतीपथावर आहे अशी माहिती ग्राम विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पाथर्डी येथे दिली.

- पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी संस्कार भवन, पाथर्डी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यावेळी उपस्थित होते.
- यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी नागरिकांनी लसीकरणासोबतच कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करता यावे यासाठी वरिष्ठ पातळीवर लसींच्या डोसचा जास्तीचा पुरवठा होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मात्र यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असून पालकमंत्री म्हणून मी ठामपणे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्यासोबत उभा राहणार आहे.
- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील रुग्ण वाढ चिंताजनक असल्याचे सांगितले. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा परिषदेने 45 अँम्बुलन्स दिल्याचे सांगितले.
- आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासनाने कोरोनाग्रस्ताच्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात असे प्रतिपादन केले.
- कोरोना निर्बंध शिथिल झाले असले तरी व्यापारी आस्थापना आणि नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी कोरोना सद्यस्थिती आणि प्रशासनाने केलेल्या कार्याची माहिती व आढावा सादर केला.
- 000